संत संताजी जगनाडे महाराज चरित्र कथा

संत संताजी जगनाडे महाराज चरित्र कथा

धरा जे मना संगती संतांची। जेणे वृत्ती ही बने संत विचारांची ।।

      याप्रमाणे संत संताजी जगनाडे महाराज हे बालवयातच संत तुकारामांचे भक्त बनले. तुकारामाचे अभंग त्यांना आवडत. सर्व अभंग त्याचे तोंडपाठ झाले होते.

     संताजींचा जन्म एका तेली कुटुंबात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. संतांजीच्या आजोबांचे नाव भिवाजी व वडिलांचे नाव विठोजी. विठोजीचा विवाह सुदुंबरे येथील मथाबाई काळे यांच्याशी झाला. संताजीचे वडील विठोजी दिवसभर घरात तेलाचे घाणे घेत. व्यवसाय तेलाचा होता. घाणे घेता घेता विठोबांचे नामःस्मरण करीत व रात्री देवाचे चिंतन करीत. असे संतांजीच्या घरात धार्मिक कार्यक्रम रोज होत. पूजा नामस्मरण व संत तुकरामाचे अभंग रोज म्हटले जात. संताजीही त्यात बालवयातच सहभागी होत असत.

     संताजीच्या मनात आईविषयी प्रेम, आदर व वडिलांचा आदर्श होता. मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआप होते, याची जाणीव संताजींना झाली. तेलाच्या व्यापारात लक्ष देता देता धार्मिक कामही होत. त्यातून मिळणारा आनंद मोठा असतो. या जाणिवेतून संताजीने संत तुकारामाच्या अभंगाचा अभ्यास केला. वेळेचा सदउपयोग म्हणजे आयुष्याचा सद्उपयोग या भावनेनेच संताजींचे वडील विठोबा घाणे घेता घेता नामस्मरण करीत होते. त्यांचे अनुकरण पुढे संताजी करू लागले. त्यातूनच त्यांचा विश्वास दृढ होत गेला. बालवयातच त्यांना धार्मिक कार्याचे बाळकडू मिळाले. आई - वडिलांनी केलेले संस्कार व वेळोवेळी संत तुकाराम महाराज यांचा मिळणारा सहवास त्यांच्यातून संत संताजी जगनाडे महाराज यांचे जीवनचरित्र्य घडत गेले. स्वभाव बनत गेला. बालवयात मिळालेल्या संस्काराची शिदोरी मोठेपणी उपयोगी पडते. मन व शरीर पवित्र राहण्यासाठी पवित्र व शुद्ध वातावरणाची गरज असते. ते संताजींना लहानपणीच मिळाले. त्यातूनच ते घडत गेले. त्यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले. संत तुकारामांवर त्यांची श्रद्धा होती. ते त्यांच्या जीवनातील सूर्य ठरले. त्यांचे श्रद्धास्थान हे नुसते अभंगस्थान नव्हते तर ते प्रेरणास्थान बनले. संत तुकारामांच्या अभंगातून प्रेरणा घेऊन संताजी हळूहळू मोठे बनू लागले. वय वाढत असताना समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. कामाचा व्याप वाढत जातो, तसा त्यांचाही दृष्टीकोन बदलला. बालवयात संत तुकारामाचे कीर्तन, प्रवचनात संताजी जात होते. पुढे । बसून मनापासून त्यांचे अभंग ऐकत असत. तुकारामांना संताजीविषयी लळा लागला होता. तुकाराम महाराज संताजीला जवळ घेत. उपदेष करीत असत. पुढे या गुरु-शिष्याचे प्रेमाचे नाते वाढत गेले. त्यांच्यातील गुरु-शिष्याचे अतुट नाते बनले. संत तुकाराम महाराजांचे अभंगातून त्यांचे जीवन अध्यात्मिक बनले. त्यातूनच त्यांना लेखनाची आवड निर्माण झाली. शेवटी श्रद्धा, विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे. आपला आंतरिक विश्वास म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान. याची जाणिव ठेऊन संताजींनी कार्य सुरू केले. काळाचे आव्हान स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र नव्हे तर समस्थ देशातील जनतेसाठी अतुलनीय कार्य केले. संत तुकाराम महाराज यांचे अभंग रचनाबद्ध करण्यासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली; परंतु वाढत्या वयाबरोबर त्यांच्या लग्नाचा विषय सुरू झाला.

संताजीचा विवाह  व अभंगाचे  लेखन  

     श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे लग्नाचे वय झाले, त्याकाळी कमी वयातच लग्न होत असे. जीवनाची पूर्तता विवाहाने होते. जसे जीवन ही लढाई आहे तसेच जीवन हा विवाह यज्ञ माणून घरात संताजीच्या विवाहाची बोलणी सुरू झाली. गृह प्रपंच संताजींना परमार्थाचे वेड अधिक होते. तरीही घरातील थोरामोठ्यांचा आदेश माता-पित्यांची इच्छा ईश्वर इच्छा माणून त्यांनी लग्नास होकार दिला. वयाच्या १० व्या वर्षी त्यांचा विवाह पुणे जिल्ह्यातील खेड येथील कहाणे घरातील यमुनाबाईबरोबर झाला.

Santa Santaji Jagnade Maharaj charitra katha     तेलाचा व्यवसाय पाहणे व घर प्रपंचात लक्ष देणे या दोन जबाबदाऱ्या संताजीवर येऊन पडल्या. अध्यात्माचे वेडही त्यांना शांत बसू देत नव्हते. अशा अवस्थेत मानसिक संतुलन बिघडले होते. त्यांना परमार्थ की घर याबाबत निर्णय घेता येत नव्हता. अशा अवस्थेत त्यांनी संत तुकारामांची भेट घेतली. तेव्हा संसार साधून परमार्थ करण्याचा सल्ला तुकाराम महाराजांनी त्याला दिला. संताजीचे संपूर्ण जीवन हे भक्तिमय बनले होते. गुरुनिष्ठा व ईश्वरनिष्ठा कशी असावी, हे समजून घ्यायचे असेल तर त्यांनी संताजीच्या चारित्र्याचा अभ्यास करावा.

     थोर संत काळाची गरज म्हणून जन्माला येतात आणि तेजस्वी नावलौकिक करून जातात. ज्ञानगंगेच्या तळाशी शेवाळात अस्पष्ट झालेली रूतलेली रले वर आणून सोडतात व सतत आयुष्यभर लोकजागृती व जनशिक्षणासाठी झगडत असतात. संताजींनी भविष्यकाळाचा अभ्यास करून वर्तमानात जगत असताना ते स्वत:चा भूतकाळ विसरले. कारण त्यांना समाज जागृतीसाठी लिखान पुरवायचे होते. संत तुकारामांच्या अभंगाचे जतन करावयाचे होते. संत तुकारामाच्या अभंगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यात संताजीचा कोणताही स्वार्थ नव्हता. नि:स्वार्थ वृत्तीने त्यांनी लिखानाचे कामास आरंभ केला होता.

     दिवा जळत असतो. त्याच्या प्रकाशात माणसे वावरत असतात, पण आपण लोकांच्या उपयोगी पडत आहोत, हे या ज्योतीला त्या प्रकाशाला माहीत नसते. दिवसभर तेलाचे घाणे हाकता हाकता तुकारामाचे अभंग संताजी म्हणत असे व रात्र झाली की तेलाच्या दिव्यात ते अभंग रचनाबद्ध करीत असे. अशा प्रकारे त्यांची दिनक्रम सुरू झाला. संपूर्ण विश्वाला आपण अमूल्य ग्रंथाचा (अभंग) देत आहोत. फार मोठे व अतुलनीय काम करीत आहोत, याची जाणीवही कदाचित संताजींना नसेल; परंतु त्यांचे कर्म ते करीत होते. एक शिष्य आपले कर्तव्य पार पाडीत होता. खरे तर संताजींनी तुकारामांचे सर्व अभंग रचनाबद्ध करून एकप्रकारची गुरुदक्षिणाच तुकारामांना अर्पण केली होती.

     संताजी नेहमीच तुकारामांच्या सहवासात राहात, तुकाराम महाराज म्हणत ते अभंग स्मरणशक्तीने रचनाबद्ध करून लिखान करीत असे. त्यांनी तुकारामांच्या अभंगांना रचना दिली. संसाराकडे दुर्लक्ष झाले घरदार सोडून त्यांनी जगजगृतीसाठी सामाजिक लिखान केले. तेल व्यापाराचा ताप, शिण हलका व्हावा म्हणून ते काव्य रचना करत संताजी विचारांनी व आचारांनी एकरूप बनले होते. माणसातील माणुसकी जागृत करणे हाच खरा धर्म, हेच खरे जनशिक्षण हे लक्षात घेऊन त्यांनी परमार्थ साधून लोकशिक्षणासाठी प्रयत्न केले होते.

संताजी जगनाडे  महाराजांनी तुकोबांची गाथा अक्षरबद्ध केली

     संत तुकारामांनी संसार साधून परमार्थ करण्याचा सल्ला संतांजीला दिला. अवघे ४१ वर्ष  तुकारामांना आयुष्य लाभले. या काळात त्यांनी ५००० अभंगाची निर्मिती केली. हे सर्व अभंग अक्षरबद्ध करण्यासाठी त्यांचे रक्षण करण्याचे काम संताजी महाराजांनी केले. आपल्या अंतकर्णात फुललेले अनुभव तुकारामांनी समाजाच्या ओंजळीत टाकले. संताजी मुळे ही गाथा समाजाची शान, बनली. संताचे जीवन हे फुलपाखराप्रमाणे असते. पंचमहाभूतांशी मैत्री करून ते चैतन्याचा अविस्कार मिळवितात.

     ज्ञान, ध्यान व गान यांच्या त्रिपुटीतून संताचे शब्द जन्मास येतात. संत तुकारामाचे हे साहित्य सोन्याची खाण होती. तिचे रक्षण व जतन, रचनाबद्ध करण्याचे खप मोठे काम संताजी महाराजांनी केले. त्या काळी समाज अशिक्षित होता. लिहिता वाचता येत नव्हते. समाजाला कीर्तन व प्रवचनातून मार्गदर्शन केले जात. व्यवसाय व संसार सांभाळून संताजींनी तुकारामाच्या गाथेचे लिखान सुरू ठेवले होते. हे करत असताना त्यांनी काव्य लिहिले. अज्ञान व अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाचे अमृत पाजले. भूतकाळ किंवा भविष्य काळात न रमता संत वर्तमान काळात जगतात व चैतन्याचा अविस्कार मिळवितात.

     संताजींनी समाजाला ज्ञानाचा व संस्कृतीचा वारसा दिला. समाजाला अमृत दिले. समाज परिवर्तनावर भर देणारे ते विचारवंत होते. गाथेचे लेखन करीत असताना त्यांना अनेक यातना झाल्या. समाजाने नाव ठेवले. कुटुंबात अनेक अडचणी निर्माण झाल्या; पण ते थांबले नाही. समाजाने दिलेल्या वेदना घेऊन समाजाला विचाराची साधना दिली. म्हणूनच त्यांचे साहित्य सोन्याची खाण ही महाराष्ट्राची शान बनली.

     भारतीय संस्कृती ही अशाचा संताजी व इतरांचा त्यागावर उभी आहे. इच्छा शक्ती व निष्ठा पणाला लावून केलेले संस्कार आयुष्यभर चिरंतन टिकतात. संताजी महाराजाची तुकाराम महाराजावर निष्ठा व श्रद्धा होती. त्यामुळेच त्यांना लौकिक प्राप्त झाला. संत गोरा कुंभार, सावता माळी, संत नरहरी, संत संताजी यांच्या सारखे कमी शिकलेले संत फार ज्ञान बोलू शकले. कारण त्यांनी आपल्या कर्मात श्रद्धा व भक्ती मिसळली त्या मुळे त्यांचे कर्म सदकर्म बनले. सदकर्म म्हणजे उपासना, उपासना म्हणजे सद्कर्म, शून्यातून शून्य वजा केला तर बाकी शन्य उरते; परंतु सद्कर्मातून कर्म वजा केले तर सत्य उरते. म्हणूनच संत अखेरपर्यंत सत्याबरोबर राहिले.

     ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, नामदेव, तुकारामाचे अभंग, एकनाथांचे एकनाथी भागवत, रामदास स्वामींचे दासबोध व श्लोक या सर्व संतांनी महाराष्ट्रात मोलाची कामगिरी केली. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे बहुजन समाजाचा धर्म व्यक्तीमार्गाची ज्योत प्रज्वलित करून समाजात संताजी महाराजांनी नवचैतन्य निर्माण केले. तुकारामच्या किर्तनामध्ये एकूण १४ टाळकरी होते. त्यामध्ये संताजी जगनाडे महाराज हेपण होते. त्यामुळे जिथे तुकारामाचे वास्तव्य असत तिथे संताजी महाराज असायचे. लाडका शिष्य म्हणून संताजीची सर्वत्र चर्चा होत होती. कीर्तन, प्रवचन अभंग लिखानात संताजीचा वेळ जात असे. त्यात सर्व अभंग स्मरणात ठेवून त्यांना रचना देत असे व सर्व अभंगाची त्यांनी गाथा तयार केली.

संताजीचे ग्रंथ व अद्वितीय विचार

     संत वचनावर विश्वास न ठेवणारा फार मोठा स्वत:ला सुसंस्कृत मानणारा समाजाचा वर्ग आहे. संतांनी आपणास वैचारिक अमृत दिले, पण ते। घेण्याची दानत आपणांत नाही. संतांनी सामाजिक जीवनात सेवानंद हाच ब्रम्हानंद मानून काम केल्याने त्यांचे जीवन गौरवशाली बनले. संतांच्या अमृतवाणीने येथील श्रोते जाणकार अभिरूची संपन्न बनले आहे. श्री संत संताजी जगनाडे यांना लिखान करण्याची खूप आवड होती. तुकाराम महाराजांकडून प्रेरणा घेऊन त्यांची आपल्या वैचारिक लिखानांचा श्री गणेशा सुरू केला होता.

     बालवयातच परमार्थचे बाळकड़ मिळाल्याने त्यांच्या लेखनीस धार निर्माण झाली होती. समाज जागृतीसाठी जे साहित्य आवश्यक आहे त्यावर त्यांनी भर दिला. संत तुकाराम महाराज यांची गाथा लिहिण्यास त्यांनी पुढाकारच घेतला नाही तर ही मौल्यवान साहित्य संपत्तीचे. त्यांनी जीवापार सांभाळली. तुकारामांचे साहित्य लिहिता लिहिता संताजींनी दोन अद्वितीय विचारांच्या ग्रंथाची निर्मिती केली. त्यात सिंधू व शंकर दीपिका हे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचे साहित्य आहे.

     संताजीच्या हस्तअक्षरातील ४ वह्या (बाड) आजही उपलब्ध आहे. तळेगाव येथील त्यांच्या वारसाकडे त्यांचे जतन करून ठेवले आहे. संताजी महाराज तेलाचा घाणा हाकत काव्य करत होते. काव्य बोलणे व त्याचे लिखाण करणे त्यांना आवडत होते. त्यांच्या या विचारातन असे दिसते की कोणत्याही कामाचा ध्यास घेतला तर आपण ते इच्छा शक्तीच्या जोरावर यशस्वी करू शकतो. त्यासाठी कष्ट साधनेची गरज असते. बालवयातच संताजीने ध्येयाचा ध्यास घेतला होता. त्यामुळे ध्येयवाद व आदर्शाचे पडसाद उमटत गेले. 

     साहित्य क्षेत्रातील संचार, सभा, भाषणे, लिखाण या सर्वांच्या बुडाशी संताजी जगनाडे महाराजांनी ध्येयाचा नंदादीप सतत तेवत ठेवला. कोणतीही अभिलाषा धरली नाही. निःस्वार्थी व नि:पक्ष व तत्वनिष्ठ भूमिका हा स्थायीभाव ठेऊन ते कार्य करीत राहिले. समाजाला देता येईल ते देतच राहिले पाहिजे. तेवढे परिश्रम केले. संत तुकाराम महाराज यांचे अभंग लिखान व समाज जागृती हा ध्यास त्यांनी घेतला होता. या ध्येयाच्या नंदादीपाच्या उजेडात जे काही कृतीत आणता येईल ते मनापासून केले. स्वतःला झोकन कार्य करीत राहिले. ध्येयाच्या खंबीर पायावर उभे राहिले. म्हणून जीवनाला व कार्याला उजाळा मिळत राहतो. याची जाणीव त्यांना झाली.

     जीवनात संताजीनी लिखानाचा व्यासंग जोपासला. त्यामळे त्यांनी अनेक प्रसंगाचे लिखाण केले. त्यामुळेच त्यांना सत्संग प्राप्त झाला. खरे तर जीवनाला आकार देण्याचे सामर्थ्य विचारात आहे व विचारांना आकार देण्याचे सामर्थ्य चिंतनात आहे. म्हणन संताजी नेहमी तुकारामांच्या अभंगाचे चिंतन करत संताजी साहित्य लिखानातून सांगिण बनले होते. आपल्या अंतकरणाचे सामर्थ्य त्यांनी लेखनीत उतरविले होते. संताजी जितके एकपाठी होते तितकेच ते नम्र होते. परमार्थाची साधना केल्याने त्यांना जीवनात लिखानाची तपश्चर्य करावयास मिळाली त्यातूनच ते अद्वितीय विचारांचे साहित्य निर्माण करू शकले. त्यांचे जतन व ते जिवापाड संभाळू शकले. शेवटी साहित्याचे शब्द समाजासाठी व संताचे शब्द परमार्थ व समाजहितासाठी असतात. जीवनास नवी दिशा देण्याचे काम संत साहित्य करीत असते.

संताजींनी वाचविली सुलतानी संकटापासून तुकारामांची गाथा

     तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा त्यांच्या अभंगाची गाथा संताजी चाकणला घेऊन आले. अभंगाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्या काळात सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. सुलतानी संकटाचा त्रास, जाळपोळ, लुटालुट अशा धुमचक्रीत शिवरायांचा पराक्रम भगवा झेंडा किल्ल्यावर फडकाविणे चालूच होते. चाकण येथील संग्राम गडावरील भगवा झेंडा शाहिस्तेखानास व दिलेरखानास दिसला तेव्हा त्याचा चाकणमध्ये धमाकूळ सुरू झाला. आसपासची सर्व गावे ओस पडली. जो तो आपआपला जीव मुठीत घेऊन पळत होता. संताजीची आई सुदुंबऱ्याला आजारी होती.

     काय करावे ते संताजींना समजेना. अभंगाच्या वह्या गाठोड्यात बांधल्या. अडोशाला बसले आग बखळीकडे येऊ लागली. मोठ्या मुश्किलीने बाहेर (पडले. काळाकुट्ट अंधार, पावसाची रिपरिप चालू बंद होत होती. त्यातून त्यांनी मार्ग काढला ते एका छप्परवजा घरात घुसले एक म्हातारा मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात लटलट कापत जीव मठीत घेऊन कोपऱ्यात बसलेला होता. पावलांचा आवाज होताच तो अधिक घाबरला. मी चाकणचा संतू जगनाड़े, सुदुंबऱ्याला चाललो. कसले हे गाठोडे ? तुकोबाचे अभंग, बाबांनी दर्शन घेतले. तेथे थांबणे धोक्याचे होते. संताजींनी रस्ता धरला...

     सुदुंबऱ्याल ओढा दोन्ही थड्यांनी अथांग पाणी होते. परमेश्वराचे व तकोबाचे स्मरण करून त्यांनी पाण्यात उडी घेतली. गाथा भिजू न देता ओढा पार केला. आईला भेटले. तुकोबांच्या गाथा पाहून आईचे हृदय प्रेमाने भरून आले. थरथरते हात गाथेवर ठेऊन आईने जगाचा निरोप घेतला. क्रियाकर्म उरकून संताजी चाकणला परतले. गाथा सुरक्षित पाहून लोकांना आनंद झाला. पालखीतून गाथांची मिरवणूक काढण्यात आली.

    चाकणवर पुन्हा सुलतानी हल्ला झाला. जाळपोळ लुटालुट व माणसांची कत्तल करणे, उभे पीक कापणे, पेटवून देणे, घरादाराची मोडतोड चाल असताना यमनाबाई व संताजी खेड येथे होते. त्यांनी लगेच चाकणचा रस्ता धरला. कारण घरात तुकोबांचा अमोल ठेवा होता. सर्वांनी त्यांना अडविले, पण अमोल ठेवा वाचविण्यासाठी आपल्या शरीराचे तुकडे झाले तरी चालतील; परंतु अभंगाच्या वह्या जपल्या पाहिजे.

     'ग्यानबा तुकाराम' जयघोष केला व चाकणची वाट धरली. भिमा नदीला मिळणारा खेडच्या बाजूने पूर्वेकडे ओढा होता. तुडुंब भरलेला ओढा पात्र मोठे, पाण्याच्या प्रवाहाबरोबर झाडे, अजस्त्र श्वापद जनावरे वाहून जात होती. संताजी ओढ्याजवळ आले. गावाचा जावई आहे काही बरे वाईट झाले तर लोक मोठमोठ्याने ओरड लागले. असल्या पाण्यात उडी मारू नका. पाणी जोरात आहे. काठी हातात घेऊन ओंडक्याच्या सहाय्याने ओढा पार केला. घरात मागच्या दाराने प्रवेश केला. बाड (अभंग) सुरक्षित पाहून आनंद झाला. वह्या पोत्यात (घोगडीत) घेतल्या. ज्वारीच्या शेतातून संताजी निघाले. मोगल सैन्य पाठलाग करीत होते. बाभळीच्या झाडावर लपून बसले. असंख्य काटे शिरल शरीर रक्तबंबाळ झाले. मध्यरात्री मोगल सैन्य निघून गेले. संताजी तळेगावाहून सुदंबऱ्याला आले.

     मोगलांचा जोर कमी होताच पुन्हा चाकणला आल. माडलला संसार पुन्हा सुरू केला, संताजींना भागुबाई व बाळोजी ही दोन अपत्ये, बाळोजी मोठा झाल्याने तेलाचा व्यवहार पाहू लागला. संताजी वयोमानानसार थकले होते. त्यांचे साथीदार त्यांना सोडन स्वर्गात गेले हात वयोमानानुसार आजार आला. त्यातच ते अनंतात विलीन झाले. आयुष्यभर प्राणाची पर्वा  ना करता मराठी माणसाची दौलत जतन करण्याचे महान कार्य संतांजींनी केले.

दिनांक 20-03-2020 19:33:48
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in